छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडावर अतिक्रमण, दगडफेक-हल्ला, अन् संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा | Mob Attacked On Mosque At Vishalgad Fort

WhatsApp Group Join Now

नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. पण हे नेमकं काय प्रकरण आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या डिजिटल बातम्या या न्यूज पोर्टल ने.
Mob attacked on mosque at vishalgad fort

रायगडानंतर विशाळगडला मराठ्यांची राजधानी समजली जायची. कोल्हापूर शहरापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कोकण सीमेवर असणारा विशाळगड हा किल्ला.

हाच तो विशाळगड किल्ला, ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना संकटातून वाचवले होते. पन्हाळगडावरून सिद्धी जोहरचा वेढा फोडून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले, तीन तोफांचा आवाज झाला आणि महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्यामुळे या गडाला इतिहासकालीन खूप महत्त्व आहे.

पण आज त्याच विशाळगडाला कित्येक वर्षापासून अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. विशाळगड हा अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी शिवभक्तांची खूप वर्षांपासूनची होती. त्यासाठी सरकारने जवळपास दीड कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला होता, तरीही जिल्हा प्रशासनाकडून तसेच अतिक्रमण धारकांकडून अतिक्रमण काढण्यात आले नव्हते. त्यामुळे शिवभक्तांच्या मनामध्ये रोष होता.

मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १४ जुलै ला “चलो विशाळगड” हा नारा दिला होता. त्यासाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त विशाळगडाकडे येत होते. सुरुवातीला शांततेच्या मार्गाने निघालेल्या आंदोलनाला अचानकपणे हिंसक वळण लागले.
आंदोलकांवर काही लोकांनी हत्यारे घेऊन सशस्त्र हल्ला केला असं आंदोलकांच म्हणणं आहे त्यामुळेच हा वाद उफाळून आला. आणि गजापूर परिसरातील मुसलमानवाडीला आंदोलकांनी लक्ष करून मोठ्या प्रमाणात तोडफोड, प्रार्थना स्थळांवर दगडफेक, जाळपोळ करत मोठी दुर्घटना घडली. mob attacked on mosque at vishalgad fort

Table of Contents

नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती व मा. पालकमंत्री बंटी पाटील यांनी घेतली नुकसान ग्रस्त कुटुंबाची भेट

अचानक उसळलेल्या तणावामुळे आजू बाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही लोकांचे उदरनिर्वाहाचे मार्गच बंद झाले आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड तणावाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच अनुषंगाने तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी १६ जुलैला खासदार शाहूमहाराज छत्रपती तसेच माजी पालकमंत्री सतेज पाटील व इंडिया आघाडी-महाविकास आघाडीतील नेते मंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली.

जेव्हा महाविकास आघाडीचे नेते विशाळगडाच्या दिशेने जात होते तेव्हा ही बातमी जिल्हा प्रशासनाला कळली व त्यांनी त्यांचा ताफा अडवला. व त्यांना गडावर जाण्यास बंदी आहे असे सांगितले, तेव्हा शाहूमहाराज छत्रपती आणि त्यांच्या मोजक्याच सहकाऱ्यांना विशाळगडावर जाण्यास परवानगी देण्यात आली. तेव्हा त्यांनी गजापूर आणि मुसलमानवाडी या ठिकाणच्या लोकांची भेट घेऊन घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

WhatsApp Group Join Now
mob attacked on mosque at vishalgad fort

अतिक्रमणे करण्यात आली जमीनदोस्त

गडावर आणि आजूबाजूला लोकांनी जवळपास 157 अतिक्रमणे केली आहेत आणि ही अतिक्रमणे लोकांना मान्य सुद्धा आहेत पण आजपर्यंत कोणीही हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढे सरसावले नाही. सरकारने ही अतिक्रमणे काढण्यासाठी निधी सुद्धा मंजूर केला असताना सुद्धा त्यावर म्हणावे तसे काम झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत गडावरील अतिक्रमण जमीनदोस्त करत नाही तोपर्यंत आपण गड सोडणार नाही अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची ग्वाही दिली.

त्यामुळे सोमवारी सकाळीच जिल्हा प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशाळगडावरच तळ ठोकुन विशाळगडावरील जवळपास ७० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. उर्वरित अतिक्रमणे लवकरच जमीनदोस्त करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. त्या अनुषंगाने विशाळगड ते गजापूर मार्गावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी

पोलीस अधीक्षकांनी जेव्हापासून कोल्हापुरचा पदभार स्वीकारला तेव्हापासून जिल्ह्यात दोन वेळा दंगल सदृश्य परिस्थिती घडलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण पसरले आहे. याला पोलीस अधीक्षकच जबाबदार आहेत. पोलीस अधीक्षक हजर असताना सुद्धा अशा घटना कशा घडू शकतात ? त्यांच्यावर कोणाचे दडपण होते का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते उपस्थित करत आहेत.

तसेच संभाजी राजे छत्रपती आणि त्यांचे सहकारी विशाळगडला येणार आहेत हे माहिती असून सुद्धा पोलीस अधीक्षकांनी व प्रशासनाने त्यांना का अडवले नाही असा सवाल करत बदलीची मागणी केली.

आंदोलकांवर गुन्हे दाखल, अन् संभाजीराजे छत्रपतींचा पोलीस ठाण्यात चार तास ठिय्या

Mob attacked on mosque at vishalgad fort गजापुर परिसरात घडलेल्या दगडफेक, जाळपोळ, गाड्यांची व घरांची तोडफोड, धार्मिक स्थळावर हल्ला, पोलिसांवर हल्ले या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. यात पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास 15 पोलीस जखमी आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांची धरपकड चालू आहे. याप्रकरणी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील जवळपास 100 हून अधिक अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी जवळपास 20 लोकांना अटक सुद्धा केली आहे.

पण ही बातमी जेव्हा संभाजीराजेंना समजली तेव्हा त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मला अटक करा अशी जोरदार मागणी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षकांनी तुमच्यावर कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही असे सांगितले. परंतु संभाजीराजे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते. ते तब्बल चार तास पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.

पैसे घेऊन महायुतीत गेलेल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला पुरोगामीत्व शिकवू नये – संभाजीराजे छत्रपती

विशाळगडावर झालेल्या तोडफोडीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती त्या टिकेला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपतींनी जोरदार हल्ला चढवला. मुश्रीफ शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करतात. विशाळगडावर झालेली अतिक्रमण पालकमंत्र्यांना का दिसत नाही असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राजघराण्यात माझा जन्म झाला आहे त्यामुळे त्यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मी प्रामाणिकपणे काम करतो. गड संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देतो. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखणे आणि गडाचे संवर्धन करणे हे माझे कर्तव्य आहे. विशाळगड मराठ्यांची राजधानी आहे. तेथे गलिच्छपणा, अवैध धंदे राजरोसपणे चालू आहे हे तुम्हाला दिसत नाही का?

तसेच दहशतवादी यासिन भटकळ हा काही दिवस गडावर वास्तव्यास होता, तेव्हा मुश्रीफ का गप्प होते असा खळबळजनक आरोप सुद्धा केला. तेव्हा माझ्यावर टीका करण्यापेक्षा यावर जर तुम्ही लक्ष घातले असते तर ही परिस्थिती घडली नसती असे म्हणत पत्रकार परिषदेत मुश्रीफांवर जोरदार टीका केली.

कोल्हापूरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर केली भूमिका

जेव्हा संभाजीराजेंनी “चलो विशाळगड” चा नारा दिला होता, तेव्हा कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रक काढून आपण या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच विशाळगडावर जो काही हिंसाचार झाला त्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी नव्हते असे जाहीरही करून टाकले. हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा न देण्याच्या काढलेल्या पत्रकाचे मुस्लिम समाजाने स्वागत केले होते.

MIM चा १९ जुलैला कोल्हापुरात मोर्चा

विशाळगडावर घडलेल्या हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी निषेध व्यक्त केला व १९ जुलैला कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. इम्तियाज जलील बोलताना म्हणाले की संभाजी राजे छत्रपती यांनी मला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे एक पुस्तक दिले होते ते कृपा करून त्यांनी एकदा वाचावे.

जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर यांनी केला श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर आरोप

विशाळगडावरील हल्ले हे संभाजी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी केलेले कटकारस्थान आहे. भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनीच ही हिंसा घडवून आणली आहे असे जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

आमच्या असंख्य ग्राहकांना आमचे जाहीर आवाहन

विशाळगडावर घडलेल्या कोणत्याही प्रकारचे आम्ही समर्थन करत नाही. आणि वाचकांनो तुम्हाला एक विनंती कृपया दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल असे फोटोज, व्हिडिओज एकमेकांना पाठवू नका. शांतता राखा, प्रशासनाला सहकार्य करा.
जय हिंद

अशाच नवनवीन बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FXyboR88flZ1YqMxQa381W

WhatsApp Group Join Now

Leave a Comment